Search This Blog

Monday 15 July 2013

तंटामुक्त गाव मोहिम; संपन्न जीवनाकडे वाटचाल

तंटामुक्त गाव मोहिम; संपन्न जीवनाकडे वाटचाल

महात्मा गांधींनी भगवत गीतेतील सत्य आणि अहिंसा या दोन शब्दांच्या शक्तीवर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. 'शांततेतून समृद्धीकडेÓ नेण्याचा मंत्र असणारी योजना म्हणजेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिस्तबद्ध न्याय-निवाडा आणि रामराज्य आणण्यासाठी आधुनिकीकरण, जागतिकीकरण, विभक्त कुटुंब पद्धत कधीच आडवी येणार नाहीत. फक्त सकारात्मक विचार हवा. महात्मा गांधीजींच्या शांततेतून समद्धीकडे या मंत्रावर, शासनाची महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम आज जागतीक पातळीवर पोहोचली आहे. यात योजनेच्या अंमलबजावणीवर सामाजिक सलोख्यासाठी, शांततेसाठी राज्याबरोबरच राष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे. राष्ट्रसंतांचा संदेश आहे की,
गावागावासी जागवा। भेदाभेद हा समूळ मिटवा।
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा। तुकड्या म्हणे।
या संदेशाची आज आठवण करून यातील अर्थ आपण आपल्या जीवनात आणायला हवा आहे.
     दि. १५ ऑगस्ट, २००७  पासून सुरु झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा आलेख आता चांगलाच उंचावला आहे.  व्यापक लोकसहभागावर अवलंबून असलेल्या या मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये शासकीय यंत्रणेचा कोणताही हस्तक्षेप नसल्याने ही मोहीम लोकांची, गावाची, स्वत:ची मोहीम आहे. जनतेशी सुसंवाद साधून सामाजिक शांतीच्या दिशेने त्यांची वाटचाल रहावी. याकरिता सहयोग आणि प्रेरकाची भूमिका शासन बजावित आहे. मोहिमेचा लेखाजोखा पाहिला तर तिला लाभलेल्या व्यापक प्रतिसादाची कल्पना येते.
तंटामुक्त गाव अभियान आज आपल्या ध्येंयापर्यंत पोहोचताना दिसत आहे. वेगवेगळे पुरस्कार राज्यातील सर्वच गावांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरीत करीत आहेत. ही मोठी उपलब्दी आहे. तंटामुक्त गाव प्रगतीची नवी वाट आज ठरत आहे. शांतता, सुरक्षितता आणि एकतेचे प्रतिक म्हणजे महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान याचा ख:या अर्थाने आज जनतेला प्रत्यय येताना दिसत आहे. ज्या गावांमध्ये शांतता आणि सुरक्षितता नांदते त्या गावातील नागरिकांची आणि गावाची मोठी प्रगती होते हे जवळपास आता सर्वांनाच पटताना दिसत आहे. प्रत्येक  गावा-गावात स्थापन झालेल्या तंटामुक्ती समितींमुळे पोलिसांवर येणारा ताण कमी होत आहे. गावातही शांतता आणि सलोख्याचे वातावरण तयार होत आहे. समाजात स्वार्थी वृत्ती वाढू लागल्याने सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत.  भांडणाच्या प्रक्रियेत माघारीची भूमिका होत नाही यामुळे गटागटात भांडणे होतात. मात्र तंटामुक्ती सामितीमुळे हे वाद सोडविणे पोलिसांना सोपे होत आहे. या सर्व गोष्टी केवळ महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमुळे होत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम आता संपूर्ण समाजाला, देशाला संमृद्धीकडे घेऊन जात आहे.   संजय निकस

No comments:

Post a Comment