Search This Blog

Monday 15 July 2013

राज्यात 611 नवीन गोदामे बांधणार - अनिल देशमुख

राज्यात 611 नवीन गोदामे बांधणार - अनिल देशमुख

अकोला :  नवीन गोदाम बांधण्याच्या योजनेनुसार 5 लाख 95 हजार मेट्रीक टन क्षमतेचे 584  गोदाम बांधण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून या योजनेसाठी 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही योजना नाबार्डच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या भारतीय अन्न महामंडळ व केंद्रीय वखार महामंडळातर्फे 3 लक्ष मेट्रीक टन क्षमतेचे 27 गोदाम बांधण्यात येणार आहेत. राज्यभरात काही नवीन गोदामांचे बांधकाम पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी काम प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
केंद्र शासनाच्या वटहुकूमानूसार अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रती माणसी 5 ‍किलो प्रमाणे प्रत्येकाला धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तांदूळ 3 रुपये प्रतीकिलो, गहू 2 रुपये प्रतीकिलो व इतर भरडधान्य 1 रुपया प्रतिकिलो प्रमाणे शासनातर्फे पुरविण्यात येणार आहे. राज्यातील 6 कोटी 75 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली. या योजनेत कुटूंब प्रमुख म्हणून त्या कुटूंबातील महिला राहणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती राहणार असून या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ही समिती नियंत्रण ठेवणार आहे. सामान्यातील सामान्य व्यक्तीला या कायद्याचा उपयोग होणार आहे. लवकरच या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment