Search This Blog

Wednesday 5 August 2020

उफाळलेल्या सौंदर्याच्या मागे धावतांना.....!

*संजय निकस पाटील*
------------
लख्ख प्रकाशात चकाकणारे गुळगुळीत रस्ते. गुळगुळीत रस्त्यांवर वायुवेगाने धावणारी वाहनं. उंच-उंच इमारती. आणि इतर बरेच काही. या सर्व गोष्टींनी एकत्र होऊन शहरांचे सौदर्य वाढविण्याचे काम केले. अगदी भरगच्च सौंदर्य शहरांमधून उफाळून बाहेर यायला लागलं, आणि ग्रामिण भागातील,  कष्ठकरी या बेगडी उफाळलेल्या सौंदर्याला भुलायला लागला. आणि शहरांकडे धावायला लागला. यामधूनच खेडेगाव आणि शहरं यामध्ये एक अलिखीत रेषाचं ओढण्यात आली. शहर ही झगमगाटांची तर खेडेगाव दारिर्दि्य आणि अर्थिक सुबत्त नसलेली, अशी भावनाच अलिकडच्या काळात गाव-खेड्यांमध्ये राहणारांची झाली आहे. शहरातील चकचकीत रस्ते, रस्त्यांच्या आजू-बाजूला लागलेल्या सुवासिक वासांच्या खाऊंच्या गाड्या. कुठेही  नजर टाकली तर उफाळून वर येत असलेलं भरगच्च सौंदर्य. सारं काही डोळ्यांच अन् तनांसह मनाचा पारण फेडणारं. चुकून कधीतरी काम काढून शहरात आलेली खेड्यातील व्यक्ती याच बेगडी सौंदर्याला, याच सुवासिक वासाला आणि भ्रामक कल्पनांना भुलते आणि आणी आपणही शहरात वास्तव्याला जावे, अशी आशा करायला लागले. त्यातच खेड्यांमध्ये रोजचीच पैशांची चणचण मग त्याला अधिकच भासायला लागते. यातून पाऊले शहरांकडे ओढली जातात. पण तो आपली आपुलकी, पे्रम, गावखेड्यांमध्ये त्यांच्याकडे इतरांचा पाहण्याचा दृष्टीकोन विसरायला लागतो, बेगडी शहरी अधिवासाकडे ओढल्या जातो. त्याला वास्तविक परिस्थीतीचे आकलन व्हायला मात्र बराच वेळ जातो. आणि शेवटी ना घरं का ना घाट का? अशी परिस्थिती  त्याची झालेली असते. कारण गावखेड्यात राहतांना कुणी चुकून सायकलवरुन घसरुन जरी पडले, हाता-पायाला थोडे जरी खरचटले तरी अख्ख्या गाव त्याची ख्याली-खुशाली विचारायला येते व कमीत कमी चार-पाच खेड्यांमध्ये सायकलवरुन पडल्याची बातमी वायुवेगाने पसरते. याच्या पूर्णपणे उलट, शहरामध्ये. कुणाचा अपघात झाला आणि दुर्देवाने कुणी मयतही झाला तर येणारे जाणारे मयत कोण आहे, कुठला आहे, किती लागले, याची पाच सेंकदसुद्धा थांबून चौकशी करीत नाहीत. एवढी विदारक परिस्थिती शहरांची आहे. मात्र हे सर्व कळायला गावखेड्यातून आलेल्या व्यक्तीला बराच वेळ शहरांमध्ये रहावे लागते, शेवटी अर्धवट शहरी जीवनाला, कुठेतरी झोपडपट्टीत, दहा बाय दहाच्या खोलीत राहल्यानंतर त्याला कळते, परंतु त्यावेळी तो आपल्या हक्काच्या आणि नैसर्गिक संपन्नतेच्या गावातून उपरा झालेला असतो. शेवटी नकोसे वाटणारे शहरी जीवनच त्याला अंगवळणी करुन घ्यावे लागते.
अलिकडच्या काळात मात्र कोरोनाने भल्या-भल्यांच्या डोळ्यावंर पडलेली शहरी झगमगाटाची बेगडी झालरं टराटरा फाडून टाकली आहे. भुकेने बेहाल झालेल्या, पोटातील चिपकलेल्या आतड्यांनी त्याला वास्तविक परिस्थितीची जाणीव करुन दिलेली आहे. हाताला काम नाही, पोटाला भाकर नाही, एकवेळं तर प्यायला पाणीसुद्धा नाही, एवढे प्रंचड हाल या खेड्यांमधून रोजगाराच्या शोधात आलेल्यांचे झाले आहेत, आणि शहरंही मोकारं उघड्या डोळ्यांनी हे सर्व पहात होते. अशावेळी ज्यांनी-ज्यांनी गावाशी असलेली नाळ अतूट ठेवली होती, त्यांनी गावांना जवळ केले. गावात गेल्यावर, शाळांमध्ये, झाडाखाली, मंदिरांमध्ये, ग्रामपंचायतींमध्ये राहले. आणि आलेल्यांना गावांनीही काही अपवाद वगळता प्रेमाने आसरां दिला. पोटाला कोर-दोन कोर भाकरं दिली. दुरुनं का होईना, पणं प्रेमाचा असरा दिला. पण ज्यांनी आपल्या जमिनी, राहती घरं विकून शहरांना जवळ केले होते, त्यांचे मात्र प्रचंड हाल झालेत. शेवटी प्रश्र येतो या शहरांनी काय दिले या लोकांना?  तर याचे उत्तर अत्यंत निराशादायकचं आहे. भूक, दारिद्र्य, अपमान, अविश्वास यापेक्षा काहीच या लोकांना मिळालेलं नाही.
या सर्व घडामोडी घडत असतांना गाव-खेडे मात्र ताठपणे कोरोनाकाळातही खंबीर उभी आहेत. गोळ्या औषधी खाऊन खाऊन आतून पोकळ झालेल्या शहरांच्या तुलनेत मनगटातील सळसळंत रक्त आजही त्याच वेगाने प्रवाही आहे. कारण निसर्ग आणि सर्वात शुद्ध वातावरण त्यांच्या अवती भवती पिंगाच घालत आहे. आजीबाईचा बटवा अजूनही  घरातील देवळीत कुठेतरी साबीत आहे. आजूबाजूला असलेली हक्काची, रोजंदारीची संमृंद्ध शेती सकस आहार द्यायला अजूनही सक्षम आहे. गावखेड्यातील लहान सहान उद्योग आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्या तुलनेत शहरी उद्योग मात्र, उद्योगातूनच उठले आहेत. त्यामुळे आता भविष्यात गावात आलेला कुणीही शहरांकडे धावणार नाही, पुन्हा उपरा होणार नाही याची खबरदारी आता गावा-गावांनीच घेणे आवश्यक आहे. गावातील माणूस गावातच राहीला पाहीजे. जगला पाहीजे. हा पक्का विचार करणे आज अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी दर पाच वर्षांनी तोंड दाखविणा:या लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली पाहीजे. शेतीशी निगडीत उद्योग गावखेड्यांमध्ये सुरु करण्यासाठी हक्काने लोकप्रतिनिधींकडे मागणी केली पाहीजे. लोकप्रतिनिधींनी जर मनावर घेतले तर त्या गोष्टीला कुणीही आडकाठी आणू शकत नाही. लोकप्रतिनिधी सरकारकडून मागून अशा प्रकारची उद्योग गावा-गावांमध्ये नक्कीच उभी करु शकतात. फक्त त्यासाठी सर्वांची मानसिकता तयार होणे आवश्यक आहे. आणि या कामात शहरांमधून गावात आलेल्या व्यक्तींना सोबत घ्या म्हणजे आणखी वेगाने तुमच्या हेतुला, प्रस्तावाला, प्रायोजनला गती येईल, यामध्ये कोणतीही शंका नाही. कारण या लोकांनी संपन्नता, सुखासीनता, नगद पैसा, या अनेक आकर्षणातून शहरं जवळ केली, पण त्यांना त्या ठिकाणी मृत्यूच दिसून आला, ही जळजळीत वास्तविकता आहे. त्यामुळे नक्कीच ही माणसं गावातच उद्योग उभारण्यासाठी मोठ्या तयारीने आघाडी घेतील. त्यातून गावागावांमध्ये उद्योग उभी राहतील, हाताला काम मिळेल, पैसा खणखणायला लागेल आणि एक दिवस नक्कीच शहरांनाही गावखेड्यांचा हेवा वाटायला लागेल....
संजय निकस पाटील
मो.क्र. ९४०५६६५५९९

No comments:

Post a Comment